नवीन खरीप पिकांची आवक सुरु झाल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : नवीन खरीप पिकाची आवक सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.सध्या, कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 54 रुपये प्रति किलो आहे आणि सरकारने मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये कांद्याची अनुदानित विक्री केल्यानंतर गेल्या एका महिन्यात किंमती घसरल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. कांद्याचे उत्पादन अधिक अपेक्षित असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

ग्राहकांना चढ्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी सरकार दिल्ली-एनसीआर आणि इतर शहरांमध्ये किरकोळ बाजारात बफर स्टॉक कांद्याची 35 रुपये प्रति किलो अनुदानित दराने विक्री करत आहे. सरकारकडे 4.5 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक असून, त्यापैकी 1.5 लाख टन कांद्याची आजपर्यंत विक्री करण्यात आली आहे.मंत्रालयाच्या अधिका-याच्या म्हणण्यानुसार, बफर स्टॉक कांदा प्रथमच रेल्वेद्वारे प्रमुख उपभोग केंद्रांवर नेला जात आहे आणि पुरवठा वाढविण्यात मदत करत आहे.

आम्ही साठा संपेपर्यंत आणि किंमती स्थिर होईपर्यंत बफर कांद्याची मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू ठेवू,असे संबधित अधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली, चेन्नई आणि गुवाहाटी येथे गेल्या काही आठवड्यात सुमारे 4,850 टन कांद्याचा रेल्वे रेकद्वारे पुरवठा करण्यात आला आहे. नाफेडचा 730 टनचा आणखी एक रेक उद्या दिल्लीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या काळात मंडई बंद असल्याने आणि मजूर रजेवर गेल्याने गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या भावावर अचानक दबाव आला होता, मात्र आता परिस्थिती सुधारू लागली आहे, असे अधिकारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here