पाटणा / मुजफ्फरपूर : बिहार सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करीत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. या अंतर्गत आता बिहारमध्ये आणखी १५ इथेनॉल युनिट्सचे काम सुरू आहे. आणि यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. शिवाय हजारो लोकांना रोजगार संधी मिळेल असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ६ एप्रिल रोजी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मोतीपूरमध्ये राज्यातील दुसऱ्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. मक्क्यापासून ११० केएलपीडी इथेनॉल उत्पादन करण्याची याची क्षमता आहे. या प्लांटसाठी १५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यामधून कमीत कमी ७०० लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.
ते म्हणाले की, बिहारमध्ये एकूण १७ इथेनॉल उत्पादक युनिट्सना मंजुरी देण्यात आली आहे, यापैकी एक पुर्णियामधील ६५,००० लिटर प्रती दिन क्षमतेची आहे. पुर्णियामध्ये भारतातील पहिला इथेनॉल उत्पादन प्लांटचे मे २०२२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, भोजपूर, गोपालगंज आणि भागलपूरसह राज्यभरात विविध ठिकाणी आणखी १५ इथेनॉल प्लांट्सचे काम सुरू आहे. पाच लाख लिटर प्रती दिन क्षमतेचा एक प्लांट आरा येथे सुरू झाल्यानंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा प्लांट ठरेल अशी अपेक्षा आहे.