लखनौ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर राज्य सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही भविष्य बनवित आहोत. योगी आदित्यनाथ यांनी एका समारंभात सांगितले, जेथे त्यांनी सहकारी ऊस समित्या आणि सहकारी साखर कारखान्यांच्या समित्यांकडे नोंदणी असलेल्या ५०.१० लाख (५.०१ मिलियन) शेतकऱ्यांना त्यांचे कामकाज पारदर्शी बनविण्यासाठी शेअर सर्टिफिकेटचे वितरण केले.
योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील लोक भवनमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, शेतकरी हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या कल्याणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही शेतकऱ्यांना केवळ भागिदार बनवत नाहीत तर ते या प्रणालीच्या मालकीशीही जोडले गेले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मी आपल्या अन्नदात्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. त्यांनी वेगवेगळ्या हवामानामध्ये नैसर्गिक आव्हानांचा सामना करत राज्याची अर्थव्यवस्था अग्रेसर बनविण्यासाठी योगदान दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य बनवित आहोत. आगामी काळात कोणताही साखर कारखाना तोट्यात सुरू राहणारा नाही. आणि सरकार उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी उपायांसाठी काम करीत आहे.
ते म्हणाले की, ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन करण्यासाठीही केला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये उच्चांकी १.७७ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटच्या ही रक्कम तिप्पट आहे. आणि २००७ ते २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या रक्कमेच्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्यांनी दावा केला की, बहुतांश साखर कारखान्यांनी कालबद्ध पद्धतीने आपली ऊस बिले दिली आहेत. सर्व साखर कारखान्यांनी असे प्रयत्न करावेत यासाठीचे नियोजन सुरू आहे. यावेळी ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, ऊस विकास तथा साखर कारखाना राज्यमंत्री संजय सिंग गंगवार, मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा, अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी उपस्थित होते.