संगरुर : साखर कारखान्याकडून २६ कोटी रुपयांची थकबाकी मिळावी या मागणीसाठी बुधवारी दोन ऊस उत्पादक शेतकरी धुरी उप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढले. तर इतर शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.
द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंदोलनामुळे कर्मचारी कार्यालयात पोहोचू शकले नसल्याने सरकारी कामकाजावर याचा परिणाम झाला. या आंदोलनामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारीही कार्यालयाकडे फिरकले नाहीत. साखर कारखाना आणि सरकारी अधिकारी वारंवार २६ कोटी रुपयांची बिले अदा करण्यासाठी बैठका घेतात. तरीही आम्हाला पैसे मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल. ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष हरजीत सिंह बुगरा यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिकारी अथवा कनिष्ठ कर्मचाऱ्याला कामावर जाण्यापासून रोखलेले नाही.