कुशीनगर : सेवरही साखर कारखान्यात स्लायजरवरुन पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सेवरही वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तमकुहीराज पोलीस ठाणे क्षेत्रातील विशुनपुरा गावातील डफाली टोला भागात राहणारे मकसूद हे सेवरही साखर कारखान्यात स्लायजरवर ऑपरेटर म्हणून हंगामी कर्मचारी होते. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुमारे २५ फूट उंचीवरुन ते जमिनीवर कोसळले. यामुळे कारखान्यात घबराट उडाली. कारखान्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सेवरही सीएचसीमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर मकसूद यांना मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच मृत मकसूद यांचे पुत्र अॅड. गुलाब हुसेन रिजवी, सरपंच जाकिर हुसेन, मुश्ताक अहमद, शंभू राय आदींसह लोक कारखान्यात पोहोचले. यावेळी अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी व कारखान्याच्या नियमानुसार रक्कम दिली जाईल, असे सांगितले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लूही घटनास्थळी आले. याबाबत तक्रार दाखल झाली असून कार्यवाही केली जाईल असे पोलीस निरीक्षक संजय कुमार यांनी सांगितले.