पुणे : महाराष्ट्रातील वाढत्या उष्णतेमुळे ऊस तोडणी मजूर आपल्या घरी परतू लागले आहेत. त्यामुळे ऊस तोडणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. पुण्यासह अनेक ऊस उत्पादक जिल्ह्यांत मार्च आणि एप्रिलमध्ये दीर्घ काळासाठी तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत राहीले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वाढत्या उकाड्यामुळे कामगारांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना घरी परतण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, कामगारांच्या या निर्णयामुळे साखर कारखानदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातून राज्यातील गळीत हंगाम आपल्या ठरलेल्या मुदतीत पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.
काही ठिकाणी हे कामगार आधी आपले शेत पेटवून देतात आणि मग उभे पिक कापतात. त्यामुळे त्यांचे काम सोपे बनते. ऊस तोडणी मजुरांच्या म्हणण्यानुसार, उन्हामुळे सकाळी आठ वाजल्यानंतर शेतात काम करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे आम्ही वेळेवर काम पूर्ण करू शकत नाही. एक एकर ऊस तोडण्यासाठी आम्हाला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.