भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यगटाने, ज्ञान भागीदार युनेस्को (पॅरिस) च्या सहकार्याने आयोजित संकल्पना आधारित जागतिक वेबिनार्सच्या मालिकांचा एक भाग म्हणून ‘शाश्वत भविष्यासाठी परंपरागत वारसा पुढे नेणे’ या विषयावर दुसऱ्या वेबिनारचे 13 एप्रिल रोजी दुपारी 12.30 ते रात्री 8.30 या वेळेत आयोजन केले आहे.
परंपरागत वारसा आणि शाश्वततेसाठी त्याची भूमिका या विषयाचे महत्त्व हे वेबिनार अधोरेखित करेल. जी 20 सदस्य आणि अतिथी राष्ट्रे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसह 29 देशांतील तज्ज्ञ यात सहभागी होतील.
सर्वसमावेशक संवादाला चालना देणे आणि शाश्वत भविष्यासाठी परंपरागत वारशाचा उपयोग करण्यासंदर्भात तज्ज्ञांचा दृष्टिकोन जाणून सखोल चर्चा करणे, हा या वेबिनारचा उद्देश आहे. ज्ञानाच्या आदानप्रदानाला चालना , सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांचा उपयोग करणे आणि परंपरागत वारसा संवर्धनातील वाव, गरजा व अडचणी ओळखणे, या बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.वेबिनार मूर्त आणि कृती-देणारे परिणाम तयार करण्यासंदर्भात जी 20 सदस्यत्वाचे प्रतिबिंब देखील दर्शवेल.
यात तीन भाषिक विभाग असतील आणि तज्ज्ञांना त्यांच्या टाईम झोनच्या आधारावर या विभागांमध्ये विभागले जाईल.अन्न आणि कृषी संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींद्वारे वेबिनारचे संचालन केले जाईल. युनेस्को (पॅरिस) च्या यूट्यूब चॅनेलवर ते थेट प्रक्षेपित केले जाईल.
परंपरागत वारसा हा समाजाचा इतिहास, ओळख आणि मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या सामाजिक प्रथा, परंपरा आणि पिढीगत ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे. हे समुदायांसाठी सामाजिक भांडवल म्हणून भूमिका बजावते, सामायिक ओळखीची भावना प्रदान करते, सामाजिक एकसंधता वाढवते आणि पिढ्यानुपिढ्यातली सांस्कृतिक चिरंतनता संवर्धित करते. यापैकी बऱ्याच पद्धती नैसर्गिक संसाधनांच्या वापरास आणि पुनर्वापराला प्राधान्य देतात, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांमधील अपव्यय कमी करण्यास आणि समतोल राखण्यासाठी योगदान देतात. अशा प्रकारे शाश्वततेत योगदान देतात. तथापि, या पारंपरिक पद्धतींना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून गैरवापराचा किंवा स्थानिक समुदायांच्या ज्ञान, आरेखनांच्या अपहाराचा धोका असतो. याखेरीज मर्यादित संशोधनामुळे, तसेच समुदायांच्या सहभागाच्या अभावामुळे या पद्धती आणि ज्ञान प्रणालींचे महत्त्व पुरेसे मानले गेलेले नाही.
संकल्पना आधारित जागतिक वेबिनार तीन आणि चार 19 आणि 20 एप्रिल रोजी नियोजित आहेत.
(Source: PIB)