पुणे : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. १५) ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचा आधुनिकरणासाठी वापर’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बारामती’ ट्रस्ट, व ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ (विस्मा) यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. साखर उद्योगात ‘ऊस पिकाची’ अत्यंत मौलिकता आहे. त्यामुळे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, मायक्रोसॉफ्ट कंपनी व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी गेल्या पाच वर्षांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे भरघोस उत्पादनासाटी प्रयत्न चालवले आहेत. या संशोधनाने ऊस उत्पादनात मोठा बदल घडवला आहे. त्याच्या प्रसारासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या दोन वर्षातील प्रतिकूल स्थितीमुळे चालू हंगाम २०२४- २५ मध्ये देशातील प्रमुख ऊस उत्पादन राज्यांपैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. चालू हंगामात उत्पादनाला फटका बसल्याने देशातील मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन ३१९ लाख टनांवरून २६५ लाख टनापर्यंत घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या आर्थिक बाबींवर फटका बसू शकतो. त्यामुळे जादा ऊस उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कार्यशाळा भरविण्यात आली आहे. सद्यस्थितीत साखर कारखाने उसापासून साखर, सहवीज, रसायने, इंधनात इथेनॉल, बायो- सीएनजी व मिथेन, हवाई इंधन, ग्रीन हायड्रोजन, बायोप्लास्टिक यामध्ये आघाडीवर आहेत. यासाठी पुरेसे, दर्जेदार ऊस उत्पादन आवश्यक आहे. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.