नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजमार्फत जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

धाराशिव : ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनाचे औचीत्य साधुन मृदेतील जैवविविधता रक्षणाकरिता नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड (रांजणी) चे चेअरमन बी बी ठोंबरे, सह कार्यकारी संचालक हर्षल ठोंबरे, शेती कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील खामसवाडी, मंगरूळ, धानोरा खुर्द आदी ठिकाणी जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण व शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

नॅचरल शुगरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जागतिक मृदा दिन कार्यक्रमांमध्ये शिवप्रसाद येळकर यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व सांगून जमिनीची काळजी घेण्यासाठी मातीचे मोजमाप, निरीक्षण आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यावरणीय आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक शाश्वत पद्धती अवलंबन्या संदर्भात माहिती दिली. येळकर यांनी आरोग्य पत्रिकेवर आधारित खत व्यवस्थापनाची माहिती देऊन मृदा आरोग्यामध्ये सेंद्रिय खतांचे महत्व, माती व पाणी नमुना घेतानाच्या तांत्रिक बाबी समजावून सांगून दर तीन वर्षांनी माती परीक्षण करणे आवश्यक असल्याचेही सांगितले.

ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर म्हणाले, शेतातील ऊसाचे पाचट काडीकचर्‍याचे अवशेष न जाळता त्यांचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्याच्या पद्धती, पिकाच्या अवशेषांमध्ये सुप्त अवस्थेमधील अळी नियंत्रण करण्यासाठी जैविक परोपजीवी बुरशी मेटारायझियम ॲनिसोप्लीचा वापर करण्यासंदर्भात माहिती दिली. पूर्व हंगामी ऊस लागवड खत नियोजन, बेणे प्रक्रिया तसेच खोडवा उसाचे व्यवस्थापन व पाचट कुजवणे याबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत गोठ्यातील गुरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखतासारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झालेली आहे.

ते म्हणाले, जमिनीचा पोत अबाधित ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून रासायनिक खतांसोबत दहा ते वीस बैलगाड्या सेंद्रिय खतांचा वापर करण्याबाबत शिफारस केली, मात्र सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून फक्त रासायनिक खतांचा वापर केला जातो. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होत आहे व जमिनी क्षारपड होत आहेत. शेतकऱ्यांना माफक दरात सेंद्रिय खते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नॅचरल शुगर कारखान्याने तयार केलेले नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर या भू-सुधारकाचा वापर करण्यासंदर्भात माहिती येळकर यांनी दिली. कार्यक्रमाला नॅचरल शुगरचे कृषी पर्यवेक्षक स्वप्निल खोसे, अनिकेत पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…असे करा खोडवा ऊस व पाचट व्यवस्थापन

ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र उपलब्ध असल्यास त्या यंत्राच्या सहाय्याने पाचटाची कुट्टी करावी. कुट्टी यंत्र उपलब्ध नसल्यास, ऊस तुटून गेल्यावर पाचट सरीमध्ये एकसारखे पसरावे. आंतरमशागत करून मोकाट पाणी द्यायचे असल्यास प्रत्येक सरीआड पाचट जमा करावे, ज्या सरीत पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते. पाचटाचे आच्छादन केल्यानंतर किंवा कुट्टी केल्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर पडलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावे. उसाचे बुडखे उंच राहिल्यास ते जमिनीलगत कोयत्याने किंवा ट्रॅक्टरचलित बुडखे छाटणी यंत्राने छाटून घ्यावेत.रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऊसाच्या बुंध्यावर कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यू पी १० ग्रॅम व मॅलेथीऑन ५० % ईसी २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया जलदगतीने होण्यासाठी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यावे.पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे, त्यासाठी पाचटावर एकरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत पसरवून टाकावे. पाचट कुजण्याची क्रिया जलदगतीने होण्यासाठी जिवाणू संवर्धक वेस्ट डीकंपोजर कल्चर कृषी विज्ञान केंद्र डिघोळ अंबा किंवा मानवलोक येथून घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळावे त्यामध्ये दोन किलो गुळ मिसळावा, पाच ते सहा दिवसांनी तयार झालेले २०० लिटर वेस्ट डीकंपोजर द्रावण फवाऱ्याच्या सहाय्याने पाचटावर फवारावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here