लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या २ लाख ५ हजार ५५५ क्विंटल साखर पोत्यांचे पूजन कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या हंगामापूर्वी कमीत कमी कालावधीत कारखान्याचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विनाअडथळा व कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेवर गाळप होण्यास मदत होत आहे. कारखान्याने आतापर्यंत २ लाख २ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप करून २ लाख ५ हजार ५५५ क्विंटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन केले आहे, असे व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी सांगितले.
सरासरी साखर उतारा १०.३५ टक्के इतका आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पात ८६ लाख ४२ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे, तर आसवनी प्रकल्पातून १७ लाख ४७ हजार लिटर आरएसची निर्मिती झाली आहे. तसेच १० डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाचे २५०० रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे ऊसबिल संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले.
लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याचेही व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजित पाटील, गोविंद डुरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर आदी उपस्थित होते.