‘मकाई’तर्फे थकीत बिले २५ नोव्हेंबरपूर्वी देण्याचे लेखी आश्वासन

सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२२-२३ ची थकीत ऊस बिले दि.८ ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी आश्वासन कारखाना व महसूल प्रशासनाने दिल्यानंतर सहाव्या दिवशी प्रा. राजेश गायकवाड यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. कारखान्याच्या थकीत बिल प्रश्नी प्रा. राजेश गायकवाड यांनी ३१ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या सहाव्या दिवशी माजी संचालक दशरथ कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ॲड. राहुल सावंत, नायब तहसीलदार गायकवाड, चिंतामणी जगताप, प्रा. रामदास झोळ, तलाठी सोमनाथ खराडे, शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब रुपनवर आदींनी मध्यस्थी करून कारखाना प्रशासनास मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.

‘मकाई’ची सर्व थकीत बिले येत्या ८ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबर पर्यंत सरसकट २३०० रुपये प्रमाणे बँकेत जमा केली जाणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी प्रा. गायकवाड यांना दिले. गायकवाड यांनी सर्वांच्या समक्ष हे लेखी आश्वासन वाचून दाखवले. त्यास सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी मान्यता दिली. आश्वासनामध्ये कसूर केल्यास सर्व पीडित शेतकरी तहसील ऑफिस समोर आत्मदहन करणार असल्याचे ॲड. राहुल सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here