पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील पंधरा वर्षांपासून निवडणूक न झालेल्या या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आज सोमवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने लोणी काळभोर येथील सहकारातील दोन कडव्या विरोधी गटांचे मनोमिलन झाले आहे. अशोक काळभोर व माधव काळभोर हे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकीय विरोधक होते. ते आता या पुढील सर्व निवडणुका एकत्र लढतील.
ज्येष्ठ नेते माधव काळभोर म्हणाले की, गावातील आमचे सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो असून, सर्व निवडणुका एकत्रित एकमेकांच्या विचाराने लढवणार आहोत. सहकारातील तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले की, अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून आम्ही मनापासून एकत्र आलो आहोत. या पुढील सर्व निवडणुका एकत्रित विचारविनिमय करून समान न्याय भावनेने काम करणार आहोत. या पुढील काळातही गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेणार आहोत.