पुणे : राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांवर कर्ज असते. राज्यात असा एकही सहकारी साखर कारखाना नाही ज्याच्यावर कर्ज नाही. त्यामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने काढलेला जमीन विक्रीचा घाट आम्ही हाणून पाडू, असा इशारा यशवंत कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी थेऊरफाटा (कुंजारवाडी) येथे पत्रकार परिषदेत दिला. यशवंत कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २६) होणार आहे. मागील चौदा वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याची ९९.२७ एकर जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव कारखान्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला आहे. या जमीन विक्रीला विरोध करत ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
कमलेश काळभोर, अजिंक्य कांचन म्हणाले, गेल्या वर्षी झालेली निवडणूक कारखान्याची जमीन विकायची नाही, या मुद्द्यावरच लढवली गेली. जमीन न विकता कारखाना चालू करु असे आश्वासन सत्ताधारी गटाने प्रचार सभेत दिले. आता ते सभासदांची फसवणूक करत आहेत. कारखाना चालू करण्यासाठी जमीन विक्री करणे हा एकमेव पर्याय नाही. सभासदांशी चर्चा करून वेगवेगळे चार पर्याय द्या. शेजारचा भीमा पाटस भाडेतत्वावर दिला जाऊ शकतो व सुरू होऊ शकतो. तर मग आपला यशवंत का नाही. कारखान्याच्या जमीन विक्रीला आमचा विरोध आहे. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, भाजपा नेते कमलेश काळभोर, अजिंक्य कांचन, वाडेबोल्हाईचे माजी सरपंच दीपक गावडे, नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी, कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे, शेतकरी संघटनेचे धनंजय काळभोर, सुर्यकांत काळभोर, निलेश काळभोर, अलंकार कांचन, सुरेश कामठे, राहुल चौधरी, सागर गोते, मारुती चौधरी, चंद्रकांत वारघडे आदी उपस्थित होते.