बीड : केज तालुक्यातील आनंदगाव (सारणी) येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक एकने सोमवारी, दि. १६ रोजी दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला. गळीत हंगामाची उद्दिष्टांच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू असल्याने कारखान्याचे चेअरमन, खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. कारखान्याच्या अकराव्या गळीत हंगामाची सुरवात ता. १६ नोव्हेंबरला झाली होती. हंगाम सुरू झाल्यानंतर तीस दिवसांत सोमवारी कारखान्याने दोन लाख टन उसाचे गाळप करून ८७ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सध्या कारखाना प्रतिदिन सात हजार मेट्रिक टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे.
येडेश्वरी कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात १९ लाख ३७ हजार ३७४ लीटर इथेनॉल आणि ४६ लाख ७५ हजार ३४० लीटर रेक्टिफाइड स्पिरिटचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडून सहवीजनिर्मिती प्रकल्पही चांगल्या पद्धतीने सुरळीत सुरू असून दररोज ताशी १० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. या हंगामात तीस दिवसात ९९ लाख ९७ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे. त्यापैकी ३९ लाख ७२ हजार सहाशे युनिट वीज महावितरण कंपनीला विक्री केली आहे अशी माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे.