पुणे : राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. दक्षिण विदर्भापासून, मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा यलो अलर्ट इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, सोलापूर, बीडे येथे उष्ण लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे येथे तापमान ४२ अंशांवर गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार पोचला आहे. दुसरीकडे राज्यात ढगाळ हवामान झाले असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. आज मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही सायंकाळनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.