लखनौ : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान समर्थन मूल्य (एमएसपी) मिळत नाही अशी टीका समाजवादी पार्टीचे (सपा) नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना सपा प्रमुख म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना वेळेवर खते, बियाणे आणि विज उपलब्ध करून देण्यात अपयशी टरले आहे. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊस बिले शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. राज्यात चालू हंगामासाठी आतापर्यंत ऊस दराची घोषणाही करण्यात आलेली नाही.
यादव म्हणाले की, सरकारच्या कारभारामुळे शेतकरी हवालदिल आहेत. शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे आणि मान्सूनच्या कालावधीत पावसाने त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. अखिलेश यांनी ऊस थकबाकीचा मुद्दा उपस्थित करीत सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून गाळप सुरू आहे. मात्र, सरकार आणि कारखानदारांकडून शोषण केले जात आहे. सरकारने १५ दिवसांत ऊस बिले शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. आणि ऊस नियंत्रण अधिनियमानुसार १४ दिवसांत बिले दिली नाहीत तर व्याज देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारने ऊस बिलेच दिलेली नाहीत. त्यामुळे व्याज देण्याची बाब तर लांबच राहिले.