हरारे : या महिन्यात सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. सध्या एल निनो-प्रेरित दुष्काळ असूनही देशाला घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पुरेसा साखर पुरवठा होईल, असे झिम्बाब्वे शुगर असोसिएशन (झेडएसए)चे विलार्ड झिरेवा यांनी सांगितले. ते म्हणाले की, २०२३-२४ या हंगामासाठी कापणीपूर्व पीक, पशुधन आणि मत्स्यपालन मूल्यांकन अहवाल (सीएलएएफए १) अनुसार, २०२२-२३ या हंगामातील ७९,७२२ हेक्टरवरून २०२३-२४ या हंगामात ७९,७२८ हेक्टरपर्यंत किरकोळ वाढ झाली आहे. साखर उद्योग हा विश्वासार्ह आहे. त्यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर तयार होईल. असे ते म्हणाले.
विलार्ड झिरेवा यांनी सांगितले की, साखर उद्योगाकडे स्थानिक बाजारपेठेतील देशांतर्गत आणि औद्योगिक गरजांसाठी पुरेसा साठा आहे. ऊस गाळप हंगाम एप्रिलच्या मध्यात पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा असल्याने सध्या कारखाना मालक साखर कारखान्यांची देखभाल करत आहेत. गेल्या कृषी हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये किमान पुढील दोन हंगाम पुरेल इतका पाणीसाठा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
झिम्बाब्वे गेल्या काही वर्षांपासून प्रतिवर्षी सरासरी ४,००,००० टन साखरेचे उत्पादन करत आहे, तर वार्षिक वापर ३,००,०००० टन आहे. त्यामुळे निर्यातीसाठी १,००,००० टन साखर अतिरिक्त शिल्लक आहे. झिम्बाब्वे शुगर असोसिएशन एक्सिप्रिमेंट स्टेशन (झेडएसएईएस) येथील वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ कॉन्सिलिया मुकांगा यांनी सांगितले की, शेतकरी पिकांवर बारकाईने लक्ष ठेवत असल्यामुळे यावर्षी उसाच्या पिकावर किट प्रादुर्भावाची पातळी कमी होती. मुकांगा म्हणाले की, २०१९-२०२० मध्ये ७.२ टक्के नुकसान झाले होते. त्यानंतर २०२१-२२ मध्ये ५.१ टक्के आणि २०२२-२३ मध्ये ८.२ टक्के नुकसान होण्याचे अनुमान होते. मात्र, यंदा तुलनेने तोटा खूपच कमी आहे.