हरारे : झिम्बाब्वेमधील टोंगाट हुलेट कंपनी ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांच्याकडील १,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या बलाढ्य साखर उत्पादक कंपनीला वाढता खर्च, चलनवाढ आणि अस्थिर चलनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. १६,००० कर्मचाऱ्यांसह, टोंगाट ह्युलेट हे झिम्बाब्वेमधील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. कंपनीने वाढत्या कामगार खर्च आणि खतांच्या किमतींसह देशाच्या अस्थिर चलनामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कंपनी झिम्बाब्वेमध्ये हिप्पो व्हॅली आणि ट्रँगल येथे असलेल्या दोन साखर कारखाने चालवते. या दोन्ही कारखान्यांची एकत्रित वार्षिक गाळप क्षमता ३.५ दशलक्ष टन आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेतील हा देश सतत आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामध्ये महागाई आणि कमकुवत चलन ही समस्या असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम टोंगाट ह्युलेटसह स्थानिक व्यवसायांवर झाला आहे. टोंगाट हुलेट झिम्बाब्वेच्या प्रवक्त्या डहलिया गार्वे यांनी रॉयटर्सला सांगितले की, फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२५ यादरम्यान तीन टप्प्यात ही कपात लागू केली जाईल. या कपातीचा परिणाम दोन्ही कारखान्यांमधील प्रत्येकी ५०० कामगारांवर होईल.
गार्वे यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान पेलताना आपल्या कामकाजात कार्यक्षमता सुधारण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. खर्च नियंत्रित करण्यासाठी आणि कंपनीला स्थिर करण्यासाठीच्या व्यापक धोरणाचा हा निर्णय एक भाग आहे. कंपनीच्या नफ्यात २०२२ पासून ५५ टक्के घट झाली आहे तर कामगार खर्च ११३ टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे आर्थिक दबावात भर पडली आहे आणि कर्जाच्या संचयनात लक्षणीय वाढ झाली आहे.