हरारे : पुढील तीन वर्षांमध्ये आम्ही चीनला साखर निर्यात सुरू करण्याची योजना तयार करीत आहोत, असे झिंबाब्वेतील मुख्य साखर कंपनी टोंगाट हुलेटचे व्यवस्थापकीय संचालक एडेन म्हेरे यांनी सांगितले. टोंगाट हुलेट झिंबाब्वेतील सर्वात मोठा साखर उद्योग समूह आहे. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना एका कार्यक्रमात म्हेरे यांनी सांगितले की, आम्ही चीनला साखर निर्यात करू इच्छितो. आम्हाला चीनमधून खूप विचारणा होत आहे. ते म्हणाले की, युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षानंतर शिपिंग आणि मालवाहतूक खर्चात खूप वाढ झाली आहे. आणि आमची कंपनी अद्याप पूर्ण उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
ते म्हणाले की, सध्या आम्ही आमच्या जवळपास ७०-७५ टक्के क्षमतेने काम करीत आहोत. जसजसे आम्ही आमच्या क्षमतेच्या १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू, तेव्हा अन्य देशांच्या प्रतिस्पर्धी खर्चानुसार साखर निर्यात करता येईल. उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही सक्षम होण्याची गरज आहे. कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये आपल्या साखर उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यास सक्षम होईल अशी अपेक्षा आहे. म्हेरे यांनी सांगितले की, २०३० पर्यंत देशातील सकल देशांतर्गत उत्पादनात आपले योगदान वाढवून ५ टक्के करण्यास साखर उद्योग उत्सुक आहे. उद्योगातर्फे यापूर्वी एवढेच योगदान दिले जात होते. टोंगाट ह्यूलेट कंपनी आधीच बोत्सवाना, कांगो, केनिया, युरोपीय संघ आणि अमेरिकेला साखर निर्यात करते. म्हेरे यांनी सांगितले की, टोंगोट ह्यूलेटद्वारे उत्पादित साखरेपैकी साठ टक्के खप स्थानिक स्तरावर आहे. तर उर्वरीत साखर निर्यात केली जाते.